Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार गीता जैन शिवसेनेत

मुंबई : वृत्तसंस्था । मिरा-भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी ‘मातोश्री’ वर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवणुकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव करून गीता जैन अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

निवडून आल्यानंतर आमदार जैन यांनी भाजप पक्षालाच पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र गेल्या एक वर्षांपासून भाजप पक्षातील स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी गीता जैन यांच्याकडे दुर्लक्षपणा केल्यामुळे नाराज गीता जैन यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. गीता जैन यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून मिरा भाईंदर १४५ आणि १४६ अश्या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे आमदार झाले आहेत.

गीता जैन या २००२ सालात काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र २००७ सालात काँग्रेस पक्षातून निवडणूक लढल्यावर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००९ सालात त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला व २०१२ सालात भाजप पक्षातून निवडणुक लढवून नगरसेविका झाल्या. त्याच बरोबर २०१४ सालात त्यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. २०१७ सालात पुन्हा भाजप पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. परंतु भाजप पक्षातून आमदारकीचे तिकीट न मिळाल्यामुळे २०१९ सालात अपक्ष आमदार म्हणून निवडणुक लढवली आणि त्या विजयी झाल्या.

Exit mobile version