Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आप’ खासदारांची पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी

 

नवी दिल्ली :: वृत्त्तसंस्थां । पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या खासदारांकडून ‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

कृषी कायद्याविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसलेत. या आंदोलकांच्या समर्थनार्थ आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींसमोर अनपेक्षितपणे घोषणाबाजी केली.

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, वकील मदन मोहन मालविय तसंच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संसद भवनात दाखल झाले. यावेळी, आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी त्यांच्या हातात फलकही होते. ‘आप’चे खासदार भगवंत मान आणि संजय सिंग यांनी घोषणाबाजी करून पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं बंद करा, हमीभावाची गॅरंटी द्या, लाखो शेतकरी थंडीत कुडकुडत मरत आहेत. अन्नदाता मरत आहेत’, अशा घोषणा आप खासदारांकडून करण्यात आल्या.

परंतु, या घोषणांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर ते तिथून निघून गेले. यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घोषणा देणाऱ्या खासदारांना अडवण्यात आलं.

 

देशाचं पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६ वी जयंती आहे. हा दिवस मोदी सरकारद्वारे ‘सुशासन दिवस’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच निमित्तानं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. यावेळी, पंतप्रधान मोदींनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यांवर पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह हेदेखील उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर आप खासदारांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी केली.

Exit mobile version