आपत्कालीन स्थितीत मुंबईचे संरक्षण जामनगर व पुणे लढाऊ हवाईतळावर अवलंबून

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई आर्थिक राजधानी असूनही हवाई संरक्षणासाठी ठोस यंत्रणा येथे नाही. आपत्कालीन स्थितीत मुंबईचे संरक्षण जामनगर व लोहगाव (पुणे) लढाऊ हवाईतळावर अवलंबून आहे. येथील समुद्री हवाई मोहिमांचे कामही आता गांधीनगरच्या हवाई दल कमांड अंतर्गत सुरू आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केल्यास मुंबई सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुंबईला सर्व प्रकारचे सुरक्षा कवच अत्यावश्यक आहे. समुद्रीस्तरावर नौदलाकडून संरक्षण भिंत उभी आहे. एनएसजीच्या तुकडीद्वारे जमिनीवरील सुरक्षाही चोख आहे. हवाईमार्गाचा विचार केल्यास जागेअभावी लढाऊ विमानांचे मुंबईला कवच नाही.

मुंबईत लढाऊ विमानांचा मोठा हवाईतळ उभा करणे किंवा लढाऊ विमानेदेखील तैनात करणे शक्य नाही. त्यासाठी मुंबईची भिस्त जामनगर किंवा लोहगाव हवाईतळावर आहे. या दोन्ही हवाईतळावर लढाऊ विमानांच्या तुकड्या असल्याने मुंबईत आपत्कालिन स्थिती उद्भवल्यास ती विमाने तिथूनच मुंबईकडे येतील. पण त्यात किमान २० मिनिटांचा कालावधी लागेल. हवाई दलाचा समुद्री हवाई मोहिमा विभाग कार्यरत आहे. त्याचे संचालन गांधीनगर येथील दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालयांतर्गत होत आहे.

एमएओचे मुख्यालय मुंबईतच आहे. याअंतर्गत हवाईदलाकडून समुद्री टेहळणी, समुद्रावरील देखरेख अशा मोहिमा राबवल्या जातात. हा विभागही गांधीनगरअंतर्गत कार्यरत आहे. अशा सर्व स्थितीत मुंबईच्या हवाई संरक्षणाचा विचार केल्यास, येथे केवळ एक हेलिकॉप्टर युनिट आहे. त्यामधील सहा हेलिकॉप्टरच कधी समुद्री गस्त तर कधी मुंबईच्या अंतर्गत भागावर टेहळणीसाठी उड्डाणे करीत असतात.प्रत्यक्षात हवेतून हल्ल्यासदृश आपत्ती मुंबईवर ओढवल्यास २५ मिनिटे दूरवरील लढाऊ विमानांवरच भिस्त असेल.

मुंबईच्या संरक्षणासाठी पश्चिम नौदल कमांडचे मुख्यालय अनेक वर्षांपासून मुंबईत आहे. याअंतर्गत युद्धनौका अरबी समुद्रात गस्तीवर असतात. पण आकाशातून आपत्ती ओढवल्यास या युद्धनौकांनादेखील मर्यादा आहेत. युद्धनौका व त्यावरील रडार सक्षम असले तरी नौदलाचादेखील लढाऊ विमानांचा तळ मुंबईत नाही. यासाठीच एमएओ व नौदल पश्चिम कमांड मुख्यालय समन्वय साधून काम करीत असतात.

Protected Content