Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आदर्श जीवनासाठी बालपणापासून संस्कार होणे आवश्यक’ – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदर्श नागरिक घडविण्यासाठी मुलांवर बालपणापासून संस्कार होणे आवश्यक आहे. बालवयातच त्यांच्यावर उत्तम संस्कार केले गेले तर त्यांच्यातील सुप्त गुणांना विकसित केले जाऊ शकेल आणि एक आदर्श समाज निर्मिती मध्ये हातभार लागेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम विभाग अंतर्गत सोहम योग गुरूकुल, समता नगरात सपत्नीक सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

 

जिल्हाधिकारी पुढे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, मुलांचे पालक धावपळीत मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाही त्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविले तर संस्कार देण्याचे कार्य उत्तम रीतीने करता येईल. असेही मत व्यक्त केले.

 

यावेळी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक, मंत्र साधना आणि चित्रकला इत्यादींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी व्यासपीठावर योगा धरणेंद्र चॅरिटेबल ट्रस्ट च्या डॉ. तनु वर्मा , सोहम योग चे संचालक, डॉ. देवानंद सोनार, गायत्री परिवार चे श्री. डी. एन. तिवारीजी हे मान्यवर उपस्थित होते. बालकांवर संस्कार करून त्यांच्यातील विविध सुप्त कला कौशल्ये विकसित करण्यासाठी सोहम योग गुरूकुल च्या माध्यमातून दर रविवारी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते. यासाठी समता नगर, जळगाव येथील गायत्री माता मंदिर आणि पालकांचे विशेष सहकार्य प्राप्त होते आहे. मुलांना या कार्यशाळेत धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि विज्ञान, भारतीय परंपरा, संगीत, गायन, चित्रकला नृत्य, आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येते आहे. त्यासाठी योगा धरणेंद्र चॅरिटेबल ट्रस्ट च्या डॉ. तनु वर्मा यांचे विशेष मार्गदर्शन लाभते आहे.

 

 

के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू. जे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. एन. भारंबे, सोहम योग चे संचालक, डॉ. देवानंद सोनार, गायत्री परिवारचे डी. एन. तिवारीजी यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन व सहकार्य लाभते आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शनासाठी प्रति रविवारी योग विभागातील आजी माजी विद्यार्थी, प्राध्यापक,  योग क्रीडा स्पर्धक आणि प्रा. पंकज खाजबागे यांचे सहकार्य लाभत आहे. या सामजिक उपक्रमाला समाजातील विविध घटकातील लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन सोहम योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी यावेळी केले.

Exit mobile version