Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आत्ममग्न मोदीं ; ‘नव्या भारताचा पाया’ चितांचा धूर , गंगेत वाहणाऱ्या शवांनी रचला

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  आत्ममग्न मोदींनी “नव्या भारताचा पाया” स्मशानातील चितांचा धूर आणि गंगेत वाहणाऱ्या शवांनी रचला अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

 

मोदी सरकारला आज सात वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण विविध मुद्यांवरून पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हणाले, “एप्रिल ते जून दरम्यान भारताचा आर्थिक दर ऐतिहासिक घसरला, कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. देशात दडपशाही पाहायला मिळते आहे. पहिल्या पाच वर्षात नोटबंदी सारखा चुकीचा निर्णय, जीएसटीचा ढिसाळ कारभार समोर आला. सर्वात जुना पक्ष शिवसेना आणि अकाली दल मोदींपासून दूर गेले. कुणाशी सल्लामसलत न करता विरोधी पक्षाशी न बोलता कृषी कायदे आणले गेले, त्यामुळे देशात प्रचंड  असंतोष आहे.  मोदींनी पुलवामा शहिदांचा राजकीय वापर केला. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद हा मोदींचा अजेंडा आहे. त्यामुळे मोदींची जगभर नाचक्की झाली.”

 

“मोदी-शाह यांचा दडपशाहीचा कारभार असून, ३७० कलम रद्द करून दंडुकेशाही राबवली. बहुमत नसतांना कायदा पास केला आणि हिंदू-मुस्लीम वाद उभा केला. हिंदुत्वाचा अजेंडा सुरू केला. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, आंदोलन चिरडून टाकली.कोरोना सुरू होण्याआधी सर्वात निच्चांकी दर होता. मोदींनी अहंकाराच्या पायी अर्थव्यवस्था रसातळाला नेली. भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेश पेक्षा कमी झालं. आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक ठिकाणी खासगीकरण केलं, वाट लावली.”

 

“ आंतरराष्ट्रीय राजकारण सुरू केलं आणि त्यामुळे ट्रम्प पडले त्यामुळे नवे राष्ट्राध्यक्ष भारताशी थोडं सांभाळून वागताय. ४५ वर्षात जे कधी घडलं नाही ते घडलं, लडाखमध्ये २० जवान शहीद झाले. चीनने आक्रमण करूनही मोदी गप्प का राहिले? भारत आणि चीनचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले. मोदींच्या अहंकाराला सीमा राहिली नाही, मोदींनी तीन कायद्यात सुधारणा केल्या, शेतकऱ्यांना वेठीस धरले. विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेता कायदे केले.सहा महिने झाले आंदोलन सुरू आहे.”

 

“मोदी कोरोना काळात अकार्यक्षम पंतप्रधान ठरले असून टाळेबंदी करतांना कुठलेही नियोजन नाही. परप्रांतीय यांच्या मोठ्या रांगा लागल्या, लोक चिरडून मेली. साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही. फसव्या आर्थिक घोषणेमुळे कुठलाही दिलासा मिळाला नाही. लस नियोजन करता आलं नाही, बाहेर लस गेली. २० ऑक्टोबर २०२० ला केंद्रीय आरोग्य सचिव ऑक्सिजन वर बोलले होते.१ लाख टन लिक्विड ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं, तेव्हा ते खोट बोलल्याचे समोर आलं.फक्त घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात काहीही केलं नाही. मोफत लस देण्याचा विषय होता, आता काय सुरुय बघा. राज्य सरकार आणि उद्योगपती यांच्याकडे लसीकरणाचा विषय ढकलताय.” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

 

Exit mobile version