Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता ‘शब्द’ घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश नाहीच ! : डॉ. अस्मिता पाटील ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । नुकत्याच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या डॉ. अस्मिता पाटील यांच्या आगामी वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. त्या राष्ट्रवादी वा शिवसेना यांच्यापैकी एका पर्यायाची निवड करतील अशी चर्चा आहे. याबाबत थेट त्यांच्याशी वार्तालाप साधून आम्ही त्यांच्याकडूनच याबाबतची माहिती जाणून घेतली.

डॉ. अस्मीता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. त्यांनी आपल्या कामाची चांगली छाप उमटवली. दरम्यान, त्यांनी २०१५ साली भाजपमध्ये प्रवेश घेतला. तर अलीकडेच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला असून आता त्या नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, प्रस्तुत प्रतिनिधीने बोलते केले असता त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले.

डॉ. अस्मिता पाटील म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपण पाचोरा-भडगाव मतदारसंघातून आमदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक होतो. मात्र पक्षाने आपला विचार केला नाही. यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तिथेही संधी मिळाली नाही. यातच आपण चांगले काम केले. विशेष करून बेटी बचाओ-बेटी पढाओ या मोहिमेत सर्वांच्या सहकार्याने चांगली कामगिरी केली. यात सर्वांच्या सहकार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील स्त्री-भ्रूणहत्येच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याने लिंगानुपाताचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी नमूद केले. असे असूनही अगदी विधानसभा वा लोकसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था अथवा सहकार क्षेत्रात सुध्दा आपला विचार न करण्यात आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.

दरम्यान, आपण राष्ट्रवादी वा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा केली असता डॉ. अस्मिता पाटील म्हणाल्या की, ते अजून ठरले नाही. तथापि, आता प्रवेश करतांना शब्द घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपली जन्मभूमि पाचोरा असली तरी कर्मभूमि जळगाव आहे. यातच जळगावातही नेतृत्वाची संधी असल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे आता डॉ. अस्मिता पाटील यांची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

 

Exit mobile version