Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता ‘मिस कॉल’ व ‘एसएमएस’ द्वारे नोंदवता येणार खंडित वीजपुरवठ्याची तक्रार

mahavitaran 1

mahavitaran 1

जळगाव प्रतिनिधी । वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता ‘मिस कॉल’ व ‘एसएमएस’ करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जळगाव परिमंडलातील जास्तीत-जास्त वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे व डिजिटल माध्यमातून वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर ‘मिस कॉल’ दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अँप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो. याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अँप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.

Exit mobile version