Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता भीती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ; मुलांना धोका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपतो न संपतो तोच आता तिसऱ्या लाटेचीही भीती सतावू लागली आहे.

 

ह्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची माहिती समोर येत असल्याने पालकांच्या काळजीत भर पडली आहे. अशातच आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने या तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे.

 

तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात उच्चांक गाठू शकते असा इशारा या समितीने दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचंही या समितीकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, ज्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे.

 

सहव्याधी असलेल्या तसंच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही या अहवालात केलेली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहेच, असंही या समितीकडून सांगण्यात आलं आहे.

 

लहान मुलांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही, ह्या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यातून असं लक्षात आलं आहे की, लहान मुलांवर कोरोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम होणार नसला तरीही ह्या मुलांमुळे इतरांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. तसंच कोरोनाची तिसरी लाट ही इतर दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल अशीही माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

 

Exit mobile version