Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता अनिल देशमुख भाजपाच्या ‘रडार’वर

 

मुंबई : वृत्तसंस्था । संजय राठोड यांचा राजीनामा आणि सचिन वाझे यांनी निलंबित करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख भाजपाच्या रडारवर असल्याचं दिसत आहे.

 

हिंगणघाटातील तरुणीचा मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह विविध घटनांचा हवाला देत भाजपाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सवाल केला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

 

सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत असतानाही गृहमंत्रीही बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खाते बदल करण्याच्या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावल्या. असं असलं तरी भाजपाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाने राज्यात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अनिल देशमुख यांना सवाल केला आहे.

 

“एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं,” असा सवाल भाजपाने केला आहे.

 

 

“महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री अनिल देशमुख हे काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका!,” असं भाजपाने म्हटलं आहे.

 

 

“माजी मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो. त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल!,” असा टोला भाजपाने लगावला आहे.

 

 

“विकृत बुद्धीचा शर्जिल उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख गाढ झोपेत आहेत,” असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.

 

 

“सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?,” असा सवालही भाजपाने देशमुख यांना केला आहे.

 

 

“रात्रंदिवस मेहनत करून पोलिसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही. मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का?,” असं म्हणत भाजपाने अनिल देशमुख यांच्या टीकास्त्र डागलं आहे.

 

 

अंबानी स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने अनिल देशमुखांकडेच गृहखाते राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version