Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा तालुक्यात आजपासून ५ दिवस ‘जनता कर्फ्यु’

पारोळा, प्रतिनिधी । येथे आज दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पुढील ५ दिवस ‘जनता कर्फ्यु’ लागू करण्याचा निर्णय तहसीलदार,नगराध्यक्ष व इतर अधिकारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात आला.

तालुक्यात पुढील ५ दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यासाठीच्या बैठकीला पदाधिकारी, अधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यात तहसीलदार अनिल गवानदे, नगराध्यक्ष करणं पवार, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, पो. नि. लीलाधर कानडे, डॉ. प्रांजली पाटील, डॉ. योगेश साळुंखे, डॉ. गिरीश जोशी, नगरसेवक पी. जी. पाटील, नवल सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष करणं पवार यांनी सांगितले की, आपल्या तालुक्यालगत अमळनेर ,भडगाव व आता धरणगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व बाहेरगावच्या नागरिकांची वाढती संख्या शहरात येत असल्याने प्रांत अधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पारोळा तालुक्यात आज पासून पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार ते सोमवार असा १०० टक्के बंद घेतला जात आहे.

भाजीपाला एक दिवसा आड
यावेळी उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी सर्वानुमते काही निर्णय घेतले. यात भाजीपाला हा एक दिवसा आड मिळणार आहे. हा भाजीपाला विक्रीस फक्त कॉलनी भागात परवानगी राहणार आहे. किराणा देखील बंद राहणार आहेत. कृषी दुकाने बंद ठेवण्याबाबत असोसिएशन सोबत चर्चा करणार असून ,औषधी दुकाने फक्त गरजे पुरता उघडतील. शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी फक्त ट्रॅक्टरला परवानगी राहील व त्यांना डिझेल पूरविले जाईल. या ५ दिवसात मोटर सायकलींना पूर्णतः बंदी असून नियम तोडल्यास कारवाई केली जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप ही ५ दिवस बंद राहतील. बँकांमध्ये गर्दी होणार नाही यासाठी सर्व प्रमुख बँकांना सूचना पत्र दिले जातील. तालुक्यातील प्रमुख ८ सीमा ह्या १०० टक्के बंद केल्या जातील. राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाहतूक ही बाय पास केली जाईल. दूध डेअरी या फक्त सकाळी २ तर संध्याकाळी २ तास सुरू राहतील. यासह इतर निर्णय सर्वानु मते घेतले गेले. यावेळी किराणा, भाजीपाला ,आदी असोसिएशनच्या पदाधिकारी यांनाही बोलावण्यात येऊन माहिती देण्यात आली.

‘जनता कर्फ्यु’ न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
यावेळी पो. नि. लीलाधर कानडे यांनी सांगितले की ५ दिवस ‘जनता कर्फ्यु’ हा तालुक्याच्या जनतेसाठी आहे. आपल्याकडे बाधित संख्या नसून ती वाढू देणे नसेल तर नियमांचे पालन करा. न केल्यास गुन्हे दाखल होतील. दुचाकीधारकांना स्पष्ट सूचना असून दंड कारवाई केली जाईल असे सांगितले. तर बाहेर गावाहून येणाऱ्यांची माहिती द्या. धोका पत्करू नका,असे आवाहन डॉ. योगेश साळुंखे, डॉ. प्रांजली पाटील यांनी केले आहे. माहिती लपविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होतील, असे संकेत दिले गेले. नगराध्यक्ष करणं पवार यांनी विशेषतः भाजीपाला ,फळ विक्रेत्यांना स्पष्ट करत सांगितले की सूचना,न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाणार आहे. आज बाजार पेठ जी रोज २ ला बंद होते ती ५ पर्यंत सुरू राहील. त्यानंतर १०० टक्के ५ दिवस बंदचे संकेत उपस्थित मान्यवरांनी दिले.

Exit mobile version