Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंदोलनाच्या संभ्रमावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

 

 

पुणे : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी आम्ही मूक आंदोलन करणार आहोत , मोर्चा काढू असे मी  कधीच म्हणालो नाही , असा खुलासा आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला

 

येत्या १६ जूनपासून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हे आंदोलन नेमकं कोणत्या स्वरूपात असणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर आता खुद्द खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून “मी कधीही मोर्चा काढणार असं म्हणालो नव्हतो”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. पुण्याच्या सीओईपी कॉलेजच्या प्रवेशद्वारावरून संभाजीराजे अहमदनगरच्या दिशेने आज रवाना झाले. कोपर्डी बलात्कार गुन्ह्यातील  पीडितेच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.

 

यावेळी  संभाजीराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटलांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर दिलं. “कधी म्हणता मोर्चे काढणार, कधी म्हणता आंदोलन करणार. संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करावी आणि समाजाची दिशाभूल करू नये”, असा आक्षेप चंद्रकांत पाटील यांनी नोंदवला होता. त्यावर बोलताना संभाजीराजेंनी उत्तर दिलं आहे. “चंद्रकांत दादा खूप सांगत असतील. तो त्यांचा विषय आहे. त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. आमचं धोरण सरळ आहे. मी कधीही मोर्चा म्हणालो नाही. माझ्या रायगड आणि मुंबईच्या भाषणात स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही मूक आंदोलन करू. देशात आत्तापर्यंत समाज बोललाय, आम्ही बोललोय. आता लोकप्रतिनिधी बोलतील. हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय, त्यावर मी कशाला काही बोलू?” असं ते म्हणाले.

 

यावेळी संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी सामुहिक बलात्कार घटनेतील दोषींच्या शिक्षेसंदर्भात भूमिका मांडली. “२०१६ला हा सामुहिक बलात्कार झाला. २०१७ला ते दोषी असल्याचा निकाल लागला. आता २०२१ आलंय. अजूनही पुढची कारवाई का झाली नाही?  आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. हे लक्षात घेता, आता राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, सहा महिन्यांत हा विषय निकाली काढावा. या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.

 

Exit mobile version