Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन शासनाने दिला आहे. 

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्यादृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत. यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेवून क्रीडा धोरण-2012 तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

या शासन निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकाचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात/ खरेदी करणे, गणवेश इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

या योजनेसाठी या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून राहील मान्यता ऑलिम्पिंक गेम्स, विश्व अजिक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, युथ ऑलिम्पिक, ज्यु विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप  या स्पर्धांना या योजनेसाठी अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता राहील. 

 

ऑलिंम्पिक स्पर्धामध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकाराचा समावेश असेल तेच खेळ/क्रीडा प्रकार या स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय राहतील. कबड्डी, खोखो, मल्लखांब या देशी खेळांचा यास अपवाद राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यतील अर्ज परिपुर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

 

अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharashra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए विंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथील कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version