अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे आम्ही केले लोकार्पण : पडळकर

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून वाद रंगले असतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण मेंढपाळांच्या हस्ते या ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून पुतळ्याचे लोकार्पण केल्याचा दावा केला आहे.

 

सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह समर्थकांच्या उपस्थितीत लोकार्पणाची तयारी केली होती. शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. पाच मेंढपाळांच्या हस्ते या लोकार्पण केले जावे, अशी त्यांनी मागणी लावून धरली होती व त्यानुसार लोकार्पणासाठी ते पुतळ्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मल्हारराव चौकात रोखून धरल्याने बराचवेळ गोंधळ सुरू होता. अखेर आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली असल्याचे सांगत, पडळकर यांनी लोकार्पण झाले असल्याची माहिती माध्यमांना दिली. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.

या संदर्भात पडळकर म्हणाले की, पोलीस प्रशासन आज आम्हाल विरोध करत आहे. महिला पोलिसांना समोर करण्यात आलं आहे, म्हणजे आमचा त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करता येतील. परंतु मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनमधून गुलाबाची फुलं अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरती टाकून हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आमचा हेतू स्पष्ट होता तो पूर्ण झाला. आम्ही मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करून, आम्ही त्या स्मारकावरती फुलं टाकली उद्घाटन केलं. पोलिसांशी संघर्ष केला नाही. सरकार जरी चुकीचं वागलं तरी आम्ही चुकीचं वागणार नाही. अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिली.

Protected Content