Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जीवनशैली निगडित मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचा आहारात समावेश करायला हवा. त्यासाठी संपूर्ण अन्न, वनस्पती आधारित आहारचे सेवन करावे. या यात फळभाज्या, डाळी, कडधान्ये, तृणधान्य यांचा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच प्रकिया केलेले पदार्थ जसे की, साखर, बेकरी पॅकेज्ड फूड, मांस याचे सेवन कमी करावे, असे प्रतिपादन अमेरिकेतील वॉशिंग्टन येथून वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. झिशान अली यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनऔषधवैद्यक शास्त्र विभागातर्फे आयोजित ‘वैद्यकीय क्षेत्रात पोषक आहाराचे महत्व’ या विषयावर डॉ. अली यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी मंचावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण शेकोकार, विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते. प्रथम डॉ. मारोती पोटे यांनी, विविध विषयांवर मार्गदर्शक व्याख्याने डॉक्टरांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे सांगितले.

यानंतर डॉ. झिशान अली यांनी सांगितले कि, रुग्णांना कोणत्या अन्नातून पोषक आहार व फळातून पोषक घटक मिळतील, ते सांगितले पाहिजे. न्याहारी, दुपारचे व रात्रीचे जेवण कसे असावे, संतुलित आहार कसा ठेवावा याची माहिती रुग्णाला मिळाली तर तो निरोगी राहील, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी जंक फूड टाळून कोणता पोषक आहार घ्यावा, हंगामी फळे, सलाद खाण्यावर भर दिला पाहिजे. याबाबतही डॉ. अली यांनी सांगितले. प्रसंगी त्यांनी अमेरिकेत करण्यात आलेल्या विविध संशोधनाचे विश्लेषण केले. डॉ. विनू वीज म्हणाल्या की, सकस आहार घ्यावा. प्रक्रिया केले पदार्थ कमी खावेत. शारीरिक हालचाली असणारे व्यायाम करावे. ८ तास शांत झोप घ्यावी. ताण-तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करावे. कौटूंबिक व सामाजिक संबंध उत्तम ठेवावे. यासह व्यसनांपासून लांब राहावे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे निवेदन डॉ. योगिता बावस्कर यांनी केले. विशेष व्याख्यानाचा ३५ प्राध्यापक डॉक्टरांनी तसेच, तिन्ही वर्षाच्या १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. चिराग रामनानी, डॉ. दीपक वाणी यांच्यासह बापू पाटील, राकेश पिंपरकर, अनिता पोलभूणे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version