Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध ऑनलाईन लॉटरीला चाप लावण्यासाठी ‘पश्‍चिम बंगाल पॅटर्न’चा होणार उपयोग

ajit pawar

मुंबई प्रतिनिधी । अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी यासंदर्भात पश्‍चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस व वित्त विभागाच्या अधिकार्‍यांचे पथक पाठवून माहिती घेण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिले.

आपल्या राज्याची ऑनलाईन लॉटरी नसली तरी बाहेरील राज्यांची ऑनलाईन लॉटरी सुरु आहे. त्यातून मिळणार्‍या महसुलात गेल्या काही महिन्यात मोठी घट झाली आहे. राज्यात अवैध पद्धतीने सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. राज्याची पेपर लॉटरी, तसेच बाहेरील राज्यांच्या ऑनलाईन लॉटरीमुळे मिळणार्‍या महसूलात घट होण्याचे मूळ हे अवैध लॉटरीत आहे. त्यामुळे अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी वित्त विभाग, पोलिस व लॉटरी वितरकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. त्यासाठी पश्‍चिम बंगालच्या पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात यावी व त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात यावा असे यावेळी बैठकीत ठरले. शिवाय लॉटरीच्या महसुलातून वाढलेली रक्कम पोलिस दलाच्या गृहनिर्माणासाठी वापरण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

Exit mobile version