Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवकाशातील युद्धासाठी भारताची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप बदलणार असून अवकाशातून युद्ध लढले जाईल. त्या दृष्टीने भारताने आता स्वत:ला समर्थ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.

दोन वर्षांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून जगाला आपल्याकडे असलेल्या उपग्रह विरोधी टेक्नोलॉजीची चुणूक दाखवली. वातावरणाच्या पलीकडे अवकाशातील उपग्रह सुद्धा आम्ही पाडू शकतो, हे भारताने या चाचणीतून दाखवून दिले. त्यापुढे जात आता भारताने डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन केली आहे. अवकाशातून धोका निर्माण झाल्यास, त्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा शोध घेण्यास डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरुवात केली आहे.

शत्रूपासून अवकाशातील आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ला समर्थ बनवणे, हे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रामुख्याने ही संस्था त्यासाठीच काम करेल. डीएसएने स्पेस सिच्युएशनल अवरेनेस टेक्नोलॉजीसाठी वेगवेगळया कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यात अवकाशात आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ कल्पना देण्याबरोबरच शत्रुची अवकाशातील संपत्ती शोधून त्याचा माग काढण्याची टेक्नोलॉजी असेल.

Exit mobile version