Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल !

पाचोरा-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा अल्पभूधारक शेतकरी दिलीप हरी बोरसे (वय – ४२) यांनी १५ जुन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जंगलातील निबांच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे.

या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, येथील गव्हाई शिवारातील शशीकांत बोरसे व नथ्थू सुकदेव यांच्या सामाईक बांधावरील निबांच्या झाडाला कोणीतरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती येथील शेतकरी राजु तावडे यांनी ग्रामस्थांना दिली. उन्हाळी कापसाची वखरणी करून राजु तावडे हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विहीर वर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. घटनेप्रकरणी पोलिस पाटील किरण तावडे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप बोरसे यांच्या मुलीचे वर्षभरापूर्वी लग्न झाले आहे. मुलगा दहावी पास झाल्याने त्याचे पुढील शिक्षण, आई – वडील म्हातारे अशा आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले असावे ? अशी चर्चा परिसरात सुरू आहे. दिलीप बोरसे हे सकाळी मुलाचा निकाल व दाखला घेण्यासाठी माध्यमिक विद्यालयातील जाऊन आले होते. येथून आल्यावर त्यांनी शेताकडे जाऊन आत्महत्या केली. दिलीप बोरसे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या पाश्च्यात्य आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. अत्यंत शांत स्वभावाचा घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version