Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्नबला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । . सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्या धनंजय चंद्रचूड व न्या इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

आत्महत्येस प्रवृत्त करणं व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं. गोस्वामी यांना तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केलं होतं. राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये अशी विनंती केली होती.

Exit mobile version