Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्णव गोस्वामी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर १ डिसेंबर रोजी सुनावणी

 

मुंबई:वृत्तसंस्था । रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी व त्यांच्या पत्नी सम्यव्रता गोस्वामी यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जांवर आता मुंबई सत्र न्यायालयात १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात ४ नोव्हेंबरच्या पहाटे अटक कारवाई होत असताना, महिला पोलिसाला धक्काबुक्की व मारहाण केली आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखले, या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात ही सुनावणी होणार आहे .

यापूर्वी या अर्जांवरील सुनावणी २३ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत अद्याप मिळाली नसल्याने त्याआधारे पुन्हा एकदा तहकुबी मागण्यात आली. त्यामुळे सत्र न्यायालयाने सुनावणीसाठी १ डिसेंबरची तारीख निश्चित केली.

अटकेच्या कारवाईनंतर पोलिसांनी गोस्वामी पती-पत्नीविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. त्यात भारतीय दंड संहितेच्या ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यास रोखणे), ५०४ (शांतता भंग होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे), ५०६ (धाकदपटशा करणे) अशी कलमे लावण्यात आली आहेत.

Exit mobile version