Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्णब गोस्वामी विरोधात जळगावात काँग्रेस धरणे आंदोलन करणार

 

जळगाव : प्रतिनिधी । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ जानेवारीरोजी दुपारी दोन वाजता धरणे आंदोलन केले जाणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झालेल्या आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णव गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट होते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ही माहिती पत्रकारिता क्षेत्रातील अर्णाब गोस्वामी यांना तीन दिवस आधी येणे म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? त्याने स्वतः सांगितले की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.

अर्णब गोस्वामी यांचे हे कृत्य ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच. पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे म्हणून अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे.

अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केले असून दूरदर्शन सॅटॅलाइट ची फ्रिक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्ही दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याची चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार दुर्लक्षित केली आहे असे या संभाषणातून दिसून येत आहे. याचा अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठिंबा आहे आणि जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार तात्काळ कारवाई करत नाही.

व्हाट्सअप चॅट वरून अर्णव गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांची अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी त्याला नियमांच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचेही स्पष्ट होत आहे. पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे. तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलीदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे.

अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्नब गोस्वामी दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करुन गोस्वामीला त्याच्या व्यवसायात फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा सुद्धा राष्ट्रद्रोहाचा भाग असून गोस्वामीला मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे. या मागणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, २३ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.असे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांनी कळविले आहे

Exit mobile version