Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे बापरे….ओमायक्रॉनच्या भितीने पत्नी व मुलांची हत्या !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट जीवघेणा नसला तरी त्याचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत असतांना काहींनी याची अकारण धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. याच प्रकारे ओमायक्रॉन हा सर्वांचा नाश करेल या भितीतून एका डॉक्टरने पत्नी, मुलगा व मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओमायक्रॉनच्या भितीमुळे एका डॉक्टरने आपली पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उघडकीस आला आहे. डॉ. सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने ४८ वर्षीय पत्नी, १८ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर भावाला फोन करुन त्याने या तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या डायरीवरुन डॉक्टरला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंता सतावत असल्याचं दिसतं. ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणं कठीण आहे. असं डॉक्टरने डायरीत लिहिलं आहे. डायरीमध्ये त्याने आपण आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडू शकत नाही. त्यामुळे सर्वांना मोक्ष मिळवून दिला आहे, असंही त्याने म्हटलं आहे.तर या डॉक्टरने देखील आत्महत्या केल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version