Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरेव्वा…! जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर; आतापर्यंत १५७६ रूग्ण कोरोनामुक्ता

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी दिवसभरात ११३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आजपर्यंत १५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचेही कौतुक केले आहे. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालीकेपासून ९२ वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रूग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात आणखी ११३ जण बरे झाल्याने आपापल्या घरी परतले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. त्याचबरोबर राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रूग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत असल्याने व नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रूग्णालयात रूग्णांना चहा, नाश्ता, जेवण आदि सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजसह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित 2589 रुग्णांपैकी आतापर्यंत 1576 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे दर हा 61 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

Exit mobile version