Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद घरातच साजरा करा; पोलीस प्रशासनाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचा आनंद नागरिकांनी घरातच साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक मंदिर, सभागृह तसेच चौकात आरती, पूजा, फोटो व मूर्ती पूजन किंवा कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिला आहे.

राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. पोलीस मुख्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी डॉ. पंजाबराव उगले बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिन नारळे, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आदी उपस्थित होते. विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव उगले पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक मंदिर, सभागृह तसेच चौकात आरती किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने नागरिकांनी घरातच राहून मूर्ती तसेच फोटोचे पूजन करावे. सार्वजनिक मंदिरात, सभागृहात किंवा चौकामध्ये मूर्तीपूजन किंवा फोटोचे पूजन करू नये. घरगुती आनंद साजरा करताना फटाके, ढोल, लाऊड स्पीकरचा उपयोग करू नये. त्याचप्रमाणे दोन समाज किंवा जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही लिखाण, घोषणा प्रसारित करू नये. सोशल मीडियाचा देखील जपून वापर करावा. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा इतर पोस्ट करू नये. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांना बळी पडू नये. पोलिसांच्या सायबर सेल विभागाचे सोशल मीडियावर लक्ष आहे. त्यामुळे फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटरवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टला फॉरवर्ड, लाईक किंवा शेअर करू नये. अशा पोस्ट आपल्या अकाउंटवर आल्या तर लागलीच डिलीट कराव्यात आणि पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन देखील यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टला लाईक करणे, शेअर करणे किंवा ती पोस्ट पुढे फॉरवर्ड करणे, असे कृत्य कोणी केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम व माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कायद्याप्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही यावेळी डॉ. उगले यांनी दिला.

प्रशासनाने सहकार्य करावे: आमदार सुरेश भोळे
उद्या श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याने प्रत्येक नागरिकाच्या मनात आनंद आहे. प्रत्येक जण हा आनंद शांततेत साजरा करणार आहे. पण काही वेळा आनंदाच्या भरात अनावधानाने कार्यकर्त्यांकडून चूक होते. अशावेळी पोलीस प्रशासनाने थेट कारवाई न करता आमच्यासारख्या लोकांना माहिती दिली तर शांततेत मार्ग काढता येईल. यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी मांडली.

Exit mobile version