Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येतील राम मंदिर २२ कोटींच्या देणग्यांचे १५ हजार चेक बाऊन्स!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अयोध्येतील राम मंदिर देणग्यांच्या चेकपैकी विश्व हिंदु परिषदेने गोळा केलेले तब्बल २२ कोटींच्या देणग्यांचे १५ हजार चेक बाऊन्स झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात देणगी मोहीम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरूपात, काहींनी ऑनलाईन ट्रान्स्फरच्या रुपात तर काहींनी चेकच्या स्वरूपात या देणग्या दिल्या.  राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून ही बाब समोर आली असून संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याचं आवाहन ट्रस्टकडून करण्यात येत आहे.  अनेक चेक  संबंधित खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाले आहेत तर अनेक चेक हे तांत्रिक समस्येमुळे बाद ठरवण्यात आले आहेत.

 

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि हा वाद मिटला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी मशिदीसाठी देखील ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देण्यात आले. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची देखील स्थापना करण्यात आली. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात प्रस्तावित राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यातले २२ कोटी रुपयांचे एकूण १५ हजार चेक बाऊन्स झाले आहेत. शिवाय यातले २ हजार चेक खुद्द अयोध्येमधल्याच देणगीदारांनी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.

 

ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी  दिलेल्या माहितीनुसार,  तांत्रिक समस्यांचं निराकरण करण्यासंदर्भात बँकाना विनंती करण्यात आली आहे. संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

Exit mobile version