अयोध्या प्रकरणात न्या. लळीत यांची माघार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या वादासाठी नेमण्यात आलेल्या घटनापीठातील न्यायमूर्ती लळीत यांनी माघार घेतली असून आता नवीन घटनापीठासमोरील तारीख २९ जानेवारीला ठरणार आहे.

याबाबत वृत्तांत असा की, अयोध्या प्रकरणी स्थगित करण्यात आलेली सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या अनुषंगाने पाच न्यायमूर्तींचा समावेश असणारे पीठ तयार करण्यात आले आहे. या पीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई तर अन्य न्यायाधीशांमध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता. या अनुषंगाने आज सुनावणी सुरू होताच मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी या. उदय उमेश लळित यांचा मुद्दा उपस्थित केला. लळित यांनी वकील असताना बाबरी मशीद प्रकरणातील एका आरोपीची बाजू मांडली होती. त्यामुळे या प्रकरणातील घटनापीठात लळित यांच्या समावेशावर धवन यांनी आक्षेप घेतला. यानंतर न्या. लळित यांनी देखील या प्रकरणातील सुनावणीपासून लांब राहण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. आता न्या. लळित यांच्या जागी नवीन न्यायाधीशाचा घटनापीठात समावेश केला जाणार आहे. २९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर नियमित सुनावणीची तारीख निश्‍चित होणार आहे.

Add Comment

Protected Content