Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार केला आहे. ट्रम्प समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड केली. आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीत एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला .

पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पोलीस सध्या ट्रम्प समर्थकांना हटवण्याचं काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर जमले होते. बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती

अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने १२ तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं असून त्यांचे तीन व्हिडीओ हटवले आहेत. या व्हिडीओंमुळे हिंसाचार भडकण्याची भीती असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विटरने नियमांचं उल्लंघन झाल्यास अकाऊंट कायमचं बंद करण्याचा इशारा दिला आहे.

फेसबुकनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. हिंसाचार सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असतानाचा व्हिडीओ फेसबुकने हटवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून हिंसाचार करु नका असं सांगितलं आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग आहोत असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version