Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी; आठवलेंची टीका

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंडगिरी करून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव बदनाम केल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी रिपब्लिकन नेत्या, अभिनेत्री पायल घोषही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही टीका केली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून राजकारण करत आहे. माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. २०२१ मध्ये देशात होणारी जनगणना जातीय आधारावर झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्र सरकारचा कृषी कायद्यला रद्द करण्याचा आग्रह शेतकरी संघटनांनी सोडून द्यावा, कृषी कायद्यावर संशोधन करण्यासाठी शेतकरी संघटनांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं. कृषी कायदा चांगला आहे. कृषी कायदा आता मागे घेणं योग्य नाही. आता ही प्रथा पडल्यास पुढे कोणीही उठून कुठल्याही कायद्याला विरोध करेल. त्यामुळे प्रत्येक कायदा मागे घ्यावा लागेल. कायदे परत घेतल्यास संविधानालाच धोका निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ठाकरे सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्य सरकारने शोधलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तर, मुंडे प्रकरणात पोलिसांनी अजूनही एफआयआर दाखल केला नाही. एफआयआर दाखल न करणं चुकीचं आहे, असं अभिनेत्री पायल घोष यांनी सांगितलं. अनुराग काश्यप प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही. मला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं पायल यांनी सांगितलं

Exit mobile version