Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेच्या एका कृतीमुळे चीनने डागली शेकडो क्षेपणास्त्रं

 

 

बीजिंग : वृत्तसंस्था । चिनी लष्कराने दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिकन युद्धनौका असतानाच लाइव्ह मिसाइल फायर ड्रिल केलं आहे. क्षेपणास्त्रांची ही चाचणी चीनने शक्तीप्रदर्शनासाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. या शक्तीप्रदर्शनादरम्यान चीनने शेकडो क्षेपणास्त्र दागले आहेत.

 

 

या चाचणीमुळे जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही या समुद्री भागामध्ये चीन आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांमधील संघर्ष सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. काही काळापूर्वीच अमेरिकेने या भागामध्ये आपली सर्वात घातक अशी यूएसएस ओहियो ही पाणबुडी पाठवली होती. शिवाय अचानक चीनने हा युद्ध अभ्यास करण्यामागे अमेरिकन विमानांनी अगदी चीनच्या मुख्य भूमीजवळ जाण्याचा प्रयत्नही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

 

या चाचणीदरम्यान चिनी लष्कराच्या दक्षिण थिएटर कमांडने समुद्रात शत्रुवर हल्ला करताना क्षेपणास्त्र कशी वापरावीत यासंदर्भातील अभ्यास केला. हा युद्धअभ्यास नक्की कुठे आणि कधी आयोजित करण्यात आलेला यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. या चाचणीमध्ये गायडेड मिसाइल चिनचुआन, फ्रिगेट हेंगयांग या दोन क्षेपणास्त्रांबरोबरच एम्फिबियस डॉक लॅण्डींग शिप वुझिसन तसेच सपोर्ट शीप असणाऱ्या चैगन हू या जहाजाचा समावेश होता.

 

चीन लष्कराचा भाग असणाऱ्या दक्षिण थिएटर कमांडकडे दक्षिणी चिनी समुद्रामधील चीनच्या जलसीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. तैवान, जपान आणि व्हिएतनामला तोंड देण्यासाठी चीनने या विशेष कमांडची निर्मिती केली आहे. या कमांडमध्ये ५०० हून अधिक वेगवेगळ्या युद्धनौकांचा समावेश आहे. चीनने ज्यावेळी समुद्रामध्ये हा युद्ध अभ्यास केला तेव्हा आकाशामध्ये अमेरिकेची टेहळणीची विमाने फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

दक्षिण चिनी समुद्राशी संबंधित अभ्यास करणाऱ्या स्ट्रॅटर्जिक सिच्युएशन नावाच्या थिंकटँकच्या दाव्यानुसार अमेरिकेचे टेहाळणी करणारं विमान हे पारसेल बेटांवरुन उडत होतं. बीजिंगमधील या थिंकटँकच्या सांगण्यानुसार हे बेट चीनच्या मुख्य भूमिपासून ३२३ किलोमीटरवर आहे. या ठिकाणाहून अमेरिकन विमानाने जाणं हे आश्चर्यचकित करणारं आहे. या विमानाने तैवानजवळून उड्डाण करत चीनच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा चीनकडून केला जातोय. या युद्ध अभ्यासामुळे दक्षिण चीनच्या समुद्रातील शांतता भंग होऊन दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. चीन महिनाभर अशापद्धतीचा युद्ध अभ्यास सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version