Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमित शाह यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यावर सुब्रमण्यम स्वामी यांचा आक्षेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामाही प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यावरून भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सर्वप्रथमच इतकं लक्ष घातलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालमधील प्रचार मोहिमेवर बारीक नजर ठेवून आहेत.

 

आठ टप्प्यात मतदान होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जीही जीवाचे रान करताना दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेचीही एकही संधी सोडत नसल्याचं चित्र असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घरचा आहेर दिला आहे.

 

बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शाह यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रसिद्ध केला, हे आश्चर्यच आहे. यातून चुकीचा संदेश जाणार असून, यातून भाजपाच्या निवडणूक मोहिमेला धक्का बसेल. पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्तेच जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा होता,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version