Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली , त्याचे काय ? ; नाना पटोले खवळले

 

मुंबई : वृत्तसंस्था । अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. त्यांची ईडी चौकशी करणार नाही. तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याचाच परिणाम राज्यात दिसतोय”, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपला सुनावले आहे

 

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने गेल्या आठवड्यात छापे टाकले आहेत. त्यापाठोपाठ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची देखील सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. या मुद्द्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून नाना पटोले यांनी त्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. “ईडी, सीबीआय चौकशीची भिती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ईडी चौकशीची मागणी केली जाऊ लागली असून त्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी भाजपाला परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे.   “आम्ही वारंवार यांच्यावर ईडी लावा, सीबीआय लावा असं म्हणत नाही. हे सत्तेत होते, तेव्हा यांच्यावर आरोप लागायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: विधानसभेत सांगायचे की हे निर्दोष आहेत. त्यावेळी कुठे गेलं होतं ईडी? तेव्हा कुठे गेलं होतं सीबीआय? पण आता मुद्दाम ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरू आहे. राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजपा ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

 

नितीन राऊतांवर होत असलेल्या आरोपांविषयी देखील नाना पटोले यांनी भाजपाचा समाचार घेतला. “आरोप तर सगळ्यांवरच होतात. नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी. लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे  असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले

 

Exit mobile version