Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मराठी वाङमय मंडळ तसेच आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर शारदीय व्याख्यानमाला २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.

अमळनेर शहराला सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक साहित्यिकांची मोठी परंपरा प्राप्त झालेली आहे. जुलै १९५१ मध्ये मराठी वाङमय मंडळाची स्थापना झाली आहे. दरवर्षी नवरात्रीत दर्जेदार व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, कवी संमेलने आयोजित केली जातात. खा.शि.मंडळाचे संचालक व प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होणार असून २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलेली आहेत.

२६ रोजी ह्याला जीवन ऐसें नाव या विषयावर वक्ते प्रख्यात नाट्य कलावंत श्रीमती फय्याज शेख व लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशोक समेळ, २७ रोजी ग्रामविकासाची संकल्पना या विषयावर वक्ते माजी सरपंच आदर्शगाव पाटोदा येथील भास्करराव पेरे पाटील, २८ रोजी संघर्षातून समृद्धीकडे या विषयावर वक्ते प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,२९ रोजी आत्म्याचा प्रवास व मृत्यू पश्चात जीवन या विषयावर वक्ते डॉ.मेधा खासगीवाले तर ३० रोजी प्रश्न आजचे उत्तर संत साहित्याचे या विषयावर वक्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद जोशी हे असणार आहेत.

अमळनेरातील रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी तसेच मराठी वाङमय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Exit mobile version