Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरासाठी ५ कोटीचा निधी मंजूर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ४ कोटी ९८ लाख रुपयांचा भरीव निधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेला मंजूर करण्यात आला आहे. आ. अनिल भाईदास पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सन 2023-23 या वर्षासाठी कोटी 85 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे . त्यातील सुमारे निम्मे रक्कम म्हणजेच सत्तेचाळीस कोटी 89 लाख रुपये वितरित करण्यास 6 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मंजुरी दिली .तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे . त्यातील 4 कोटी 98 लाख रुपयांचा निधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला मंजूर झाला आहे. त्यापैकी 2 कोटी 41 लाख रुपये निधी पर्यटन विभागाला वितरीत करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 29 विविध योजनांसाठी पर्यटन क्षेत्रांशी संबंधित रस्ते, पाणी, निवास, तलाव, जुन्या इमारतीचे संरक्षण यासह इतर विकासकामांकरिता पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल झालेले होते. अमळनेरच्या मंगळग्रह संस्थेला यातून निधी मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील सतत प्रयत्नशील होते,महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा आताचे विरोधीपक्ष नेते ना अजितदादा पवार तसेच पर्यटन विकास मंत्र्यांकडे त्यांनी पाठपुरावा केला होता,सरकार बदलल्यानंतर त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडेही पाठपुरावा करून अमळनेर च्या मंगळग्रह मंदिराचे वाढते प्रस्थ आणि निधीची गरज या अनुषंगाने पाठपुरावा केला,अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन पर्यटन विभागाचे अवर सचिव संजय जाधव यांनी निधीस मंजुरी आणि वितरणासंदर्भातील आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे धुळे व जळगाव जिल्ह्यात फक्त श्री मंगळग्रह मंदिरालाच हा निधी मिळाला आहे.

सुमारे 10 वर्षांपासून या निधी प्राप्ती साठी मंगळ ग्रह सेवा संस्था सातत्याने प्रयत्नशील होती.त्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी जोमाने प्रयत्न केल्याने हा निधी पर्यटन विभागाकडे वर्ग झाला आहे. पर्यटन विभाग शासकीय नियम व निकषांन्वये निविदा काढून विकास कामे करणार आहे.सदर निधीच्या मंजुरीबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, पर्यटन विकास मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी वर्गाचे अमळनेर कर जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

असा होणार विकास
सदर निधीतून भव्य तीन मजली सुसज्ज भक्त निवास, प्रत्येक मजल्यावर ८ खोल्या (प्रसाधन गृह सह), स्वतंत्र भक्ती निवास कार्यालय, विकलांग व्यक्तीसाठी रॅम्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग (पाऊस पुनर्भरण), भक्त निवासासाठी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प, स्वतंत्र पाणी पुरवठा टाकी, संपूर्ण विद्युतकरण, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा, लिफ्ट यासह इतर भरीव विकास कामे होणार आहेत.

पुढील टप्प्यात वाडी संस्थान व वर्नेश्वर संस्थानला मिळणार निधी,,,
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनाकडे श्री मंगळग्रह मंदिरासह संत सखाराम महाराज वाडी संस्थान व वर्नेश्वर महादेव मंदिर संस्थान साठी एकूण 25 कोटी निधीचा प्रस्ताव सादर केला होता,त्यात पहिल्या टप्प्यात श्री मंगळग्रह मंदिरास 5 कोटी मिळाले असून पुढील टप्प्यात वाडी संस्थान व वर्नेश्वर मंदिरास निधी मंजूर होईल असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version