Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

मुंबई प्रतिनिधी । उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषीत केल्यानुसार अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अभियांत्रीकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली होती. यानंतर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रकही राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे.

अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर १६ डिसेंबरपर्यंत अर्ज निश्‍चितीसाठी कालावधी आहे. १८ डिसेंबर रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी, तर २२ डिसेंबर रोजी अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यंदा प्रवेशाची दोन फेरी असून, पहिली फेरी २३ डिसेंबर, तर दुसरी फेरी १ जानेवारी रोजी सुरू होत आहे. प्रवेशाचा कटऑफ १४ जानेवारीपर्यंत असणार आहे.

तर फार्मसीत औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत अर्ज करावा लागेल. तसेच दि. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज निश्‍चिती करता येईल. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी २१ डिसेंबर रोजी जाहीर होईल. पहिली फेरी २२ डिसेंबर रोजी, तर प्रवेशाची दुसरी फेरी ३१ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

दरम्यान, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत होत आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी २१ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. पहिली फेरी २२ डिसेंबर, तर दुसरी फेरी ३१ डिसेंबरला आहे.

Exit mobile version