Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभय बंग यांच्यावर वडेट्टीवार यांची टीका

 

नागपूर : वृत्तसंस्था । राज्य सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर, अभय बंग यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे

 

“अभय बंग हे महान जगव्यापी सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत, ते महान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. एकही माणूस गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू खात नाही, सिगारेट पीत नाही, दारू पीत नाही एवढं महान कार्य त्याचं आहे. त्यामुळे त्यांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे.”  असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनेक घडामोडीवर भाष्य देखील केले.

 

पेट्रोल -डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल मुंबईत भाई जगताप हे आंदोलनादरम्यान पोलिसांच्या अंगावर गेले होते, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही त्यांना मंत्री म्हणून समज देणार का? या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, “कसली समज, स्मृती इराणी यांना आठवण करून द्यायची समज त्यांना देऊ, ७०रुपये लिटर पेट्रोल असताना रस्त्यावर बसणार्‍या बाई, आता गायब झाल्या आहेत१०५ रुपये पेट्रोल होऊन देखील. भाजपाची आता मंडळी कुठे आहे? असा सवाल उपस्थित करीत भाजपाच्या नेत्यावर त्यांनी निशाणा साधला. भाई जगताप अंगावर धावून गेले नाहीत, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.” असं सांगत त्यांनी भाई जगताप यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले.

 

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना शुभेच्छा असल्याची भूमिका मांडली.

 

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २६ आणि २७ जून रोजी दोन दिवसीय लोणावळा येथे शिबीर होणार आहे. या शिबिरात राज्यातील २५० प्रतिनिधी सहभागी होतील आणि त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. या दोन दिवसीय शिबिरात ओबीसी समाजातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे आवाहन मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच, त्यांनी ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यातून समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी देखील यावेळी केली.

 

Exit mobile version