Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अन्वय नाईक आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या ; अर्नबचा हाय कोर्टात अर्ज

 

 

मुंबई: : वृत्तसंस्था । वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या तपासाबद्दल रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी आज मुंबई हायकोर्टात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले आहेत. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबत हे अर्ज आहेत.

अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून बरंच वादळ उठलं होतं. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, अर्णब गोस्वामी हे कोठडीत मोबाइल वापरत असल्याचे आढळल्याने तातडीने त्यांची रवानगी अलिबाग येथून तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दुसरीकडे त्यांची जामिनासाठी धडपड सुरू होती.

अलिबाग कोर्टात तातडीने सुनावणीस नकार मिळाल्याने त्यांनी लगेचच मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर अर्णब यांनी थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन अर्णब यांना जामीन मंजूर झाला आणि त्याचदिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्तही करण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्णब यांनी आज दोन महत्त्वाचे अर्ज मुंबई हायकोर्टात सादर केले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह पुढील संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती अर्णब यांच्या एका अर्जात करण्यात आली आहे तर अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती अर्णब यांच्या दुसऱ्या अर्जात करण्यात आली आहे.

Exit mobile version