Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार ; जयंत पाटलांचा खुलासा

 

मुंबई : वृत्तसंस्था । अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित  कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही”, असं जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

 

 

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. या प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

मुंबईतल्या वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक होत असून यामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर ते थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी निघाले. त्यामुळे सरकारची बदनामी आणि नाचक्की टाळण्यासाठी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता जयंत पाटील यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण केलं आहे.

 

 

 

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सीआययूमधील त्यांचे सहकारी रियाज काझी यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये विरोधकांकडून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सचिन वाझे, रियाज काझी हे अधिकारी थेट परमबीर सिंग यांच्या हाताखाली येत असल्यामुळे त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

सचिन वाझे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी मध्यरात्री सचिन वाझे यांना एनआयएनं अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण देखील एनआयएकडेच चौकशीसाठी जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

Exit mobile version