Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली वैद्यकीय अधीक्षकांची हकालपट्टी

जळगाव, प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या महाविद्यालय परिषद बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांची हकालपट्टी केली आहे. तसेच दोन उप अधिष्ठात्यांची नेमणूक देखील  केली आहे.

 

महाविद्यालय परिषद बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी ताशेरे ओढत विभाग प्रमुखांना फैलावर घेतले. तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुखांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. यापुढे कामात ढिसाळपणा झाल्यास तसेच रुग्णसेवेत हलगर्जीपणा आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या कारभारात सुसूत्रता यावी, रुग्णांना उपचार घेतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी डॉ. जयप्रकाश रामानंद प्रयत्नशील आहेत. त्यांनी पदभार घेतल्यानंतर मंगळवारी दि. ४ जानेवारी रोजी महाविद्यालय परिषदेची पहिली बैठक घेतली. बैठकीत रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करतांना होत असलेली गैरसोय व रुग्णांना येणाऱ्या प्रचंड अडचणी, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे ढिसाळ, विस्कळीत नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव दाखले यांना फैलावर घेत त्यांची तात्काळ हकालपट्टी केली. पुढील काळात मनुष्यबळाचे योग्य पद्धतीने नियोजन करून पारदर्शक लोकाभिमुख रुग्ण सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची कार्यपद्धती बदलवली जाणार आहे. बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उप अधिष्ठाता म्हणून शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर) व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.किशोर इंगोले (पदविपूर्व) यांची निवड झाली आहे. नवीन वैद्यकीय अधीक्षकांची गुरुवारी निवड करण्यात येणार असून सध्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात दंतशल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांनी पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाविद्यालय परिषदेच्या बैठकीमध्ये कोरोना महामारीच्या तिसरा लाटेच्या पूर्वतयारीविषयी चर्चा करण्यात आली. त्यासाठी लागणाऱ्या विविध साधन सामुग्री, मनुष्यबळ याबाबत माहिती घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या.

Exit mobile version