Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अत्याचार व अन्याय सहन करणारे अत्याचार करणाऱ्यांपेक्षा जास्त दोषी असतात : अॅड सिमा जाधव

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अत्याचार व अन्याय सहन करणारे हे अत्याचार करणाऱ्यांपेक्षा जास्त दोषी असतात असे प्रतिपादन अॅड. सीमा जाधव यांनी केले.त्या लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी तरसोद जि.प.शाळेत विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर सोनवणे, ग्रेडेड मुख्याध्यापक बाळकृष्ण ठोसरे, ऊखर्डू चव्हाण, निवृत्ती खडके, विजय लुल्हे, सुषमा पाटील तसेच रासेयो एकक प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. मिलिंद काळे (शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव ), सहाय्यक डॉ. रविंद्र लढे व महिला कार्यक्रमाधिकारी उत्कर्षा भंगाळे मान्यवर उपस्थित होते.

अॅड. सीमा जाधव यांनी ४९८ कलमाअंतर्गत होणाऱ्या दुरुपयोगाची खंत व्यक्त करून पोक्सो कायदा,मॅरेज फ्री कौन्सिलिंग, मनोधैर्य योजना यांची माहिती दिली. अन्यायग्रस्त तरुणी व विवाहितांनी अन्यायाविरोधात आवाज निश्चितच उठवला पाहिजे मात्र संघर्ष करताना तो कायदेशीर असावा बदला घेण्याच्या सुड भावनेमुळे स्वतःचे आयुष्य बरबाद करू नका अशी समज त्यांनी सोदाहरण दिली. समायोजन आणि आत्मसमर्पण ही संसाररथाची अजोड चाक आहेत. प्रमुख अतिथी नारीशक्ती गृपच्या अध्यक्षा मनिषा पाटील मार्गदर्शनात म्हणाल्या की, ग्रामीण भागात स्रिया बदनामीला घाबरतात म्हणून गुन्हेगारांना शिक्षा होत नाही परिणामी ग्रामीण भागात स्रियांवर अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे . नारीशक्ती संघटीत झाली तर गुंड प्रवृत्ती निश्चित कमी होईल. उपशिक्षक ऊखर्डू चव्हाण यांनी समयोचित चारोळ्या सादर करून दाद मिळविली.
द्वितीय सत्रात इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देतांना सनातन्यांचा प्रचंड विरोध व अपमान सहन करत जे दिव्य केलं त्या प्रसंगांवर आधारित चिंतनपर लक्षवेधी पथनाट्य सादर केले. दिग्दर्शन प्राशिक्षणार्थी पुजा पवार व रिंकू कोळी यांनी केली. इयत्ता ५ वीची विद्यार्थीनी भाविका पाटील हीने ‘ मी सावित्रीबाई फुले ‘ बोलतोय ही एकांकीका साभिनय सादर केली. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी पथनाट्य समुहातील महात्मा ज्योतिबा फुले यांची भुमिका करणाऱ्या गणेश चोथमल याच्या अभिनयाचे कौतुक करीत सांघिक व उत्कृष्ट एकपात्री अभिनय करणाऱ्या भाविका पाटील विद्यार्थीनीला रोख बक्षिस देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी सुखी संसाराच्या टिप्स सांगून समारोप केला. कार्यक्रमास लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी प्रेरणा व उपप्राचार्य डॉ. धनू महाजन व प्रा. डॉ. निलेश चौधरी यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सुषमा भालेराव, नितिन पवार, उमेश पवार, हेमंत चौधरी, तेजस्विता जाधव यांचे सहकार्य मिळाले. सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी पूजा पवार व आभार रिंकू कोळी यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांसह मायाबाई चोथमल यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.

Exit mobile version