Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अत्यवस्थ सहा वर्षीय बालिकेचे प्राण वाचविण्यात यश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपड्यात मोलमजुरीसाठी आलेल्या मध्यप्रदेशातील सहा वर्षीय मुलीवर धारदार शस्त्राचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. अत्यवस्थ असलेल्या हि सहा वर्षीय चिमुकली वैद्यकीय पथकाच्या कौशल्याने आश्चर्यकारकरित्या बचावली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला जीवदान मिळाले आहे. गुरुवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी या मुलीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 

मूळची बेलधार (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेली हि आदिवासी समाजातील चिमुरडी आई-वडिलांसह चोपडा येथे मोलमजुरी करून राहतात. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी तिला अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते. तिला उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अतिदक्षता कक्ष क्रमांक १ येथे दाखल करण्यात आले. तिची प्रकृती पाहता, ती बेशुद्ध होती. श्वास घ्यायला त्रास होत होता. प्रचंड मानसिक धक्क्यातून जात होती. प्रचंड रक्तस्राव झाला होता. त्यामुळे तातडीने शल्यचिकित्सा विभागाने तिला शस्त्रक्रिया कक्षात घेतले.
हातावर, डोक्यावर, चेहऱ्यावरील वार पाहता भीषणता दिसून येत होती. मेंदूत देखील रक्तस्राव झाल्याचे वैद्यकीय पथकाला समजले. तब्बल २ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत वैद्यकीय पथकांने जिद्दीने यश मिळविले. त्यानंतर तिला कक्ष क्रमांक ८ येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला २ रक्तपिशव्या लागल्या. तीन आठवडे उपचार झाल्यावर गुरुवारी २४ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते यशस्वीपणे निरोप देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी कौतुक केले आहे.
उपचार करण्यासाठी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील यांच्यासह शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, अतिदक्षता कक्ष क्रमांक १ इन्चार्ज जयश्री जोगी, कक्ष ८ च्या इन्चार्ज सुरेखा महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version