Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून करा; जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरु नये याकरीता ग्रामविकास विकास, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने एकमेकांमध्ये समन्वय राखून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आढावा बैठकीत दिले. 

चाळीसगाव शहरासह तालुक्यात 31 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांचेसह ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, लघुपाटबंधारे, शिक्षण, राज्य परिवहन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदि विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली आहे. त्यामुळे या भागात दुर्गधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता सर्व संबंधीत विभगांनी तातडने पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी. कृषि विभागाने शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे. पंचनामे करण्यासाठी इतर तालुक्यातील मनुष्यबळाचा वापर करावा. बेघरांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमधील नागरीकांना आवश्यक त्या सोईसुविधा नगरपालिकेने पुरवाव्यात. आरोग्य विभागामार्फत या भागात आरोग्य शिबिर घेऊन नागरीकांची तपासणी करावी तसेच लसीकरण शिबिर घ्यावे तर पशुसंवर्धन विभागाने या भागातील जनावरांची आरोग्य तपासणी करुन त्यांचेसाठीही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – आमदार मंगेश चव्हाण

अतिवृष्टी झालेल्या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तसेच पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. गावातील विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने ते पाणी पिण्यासाठी उपयुक्त नसल्याने त्यांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याची सुचना आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. पशुसंवर्धन विभागाने मृत रोगराई पसरु नये याकरीता जनावरांची विल्हेवाट लावावी, जनावरांचा मृत्यु दाखला तातडीने उपलब्ध करुन द्यावा, नदी किनाऱ्याचा भाग शोधून मृत जनावरे आढळल्यास त्यांची विल्हेवाट लावावी. तसेच शाळा, आंगणवाड्या, पाणीपुरवठा योजना, रस्ते, विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव तयार करण्याच्याही सुचना केल्यात. रस्त्यांच्या नुकसानीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे याकरीता रस्त्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे.  त्याचबरोबर ज्या नागरीकांची पुरात कागदपत्रे वाहून गेली असेल त्यांचेसाठी शिबिर लावून त्यांना आवश्यक ती कागदपत्रांसाठी शिबिर घेण्यात यावे. ज्या गावातील एसटी सेवा बंद असेल ती सुरु करण्याच्याही सुचना त्यांनी बैठकीत दिल्यात. तसेच पुरामुळे नदी, नाल्यातील मोऱ्यांना अडकलेला कचरा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत काढून घेण्याचीही सुचना त्यांनी केली. या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तसेच पुढील काळात करण्यात येणार असलेल्या कामांची माहिती दिली.

Exit mobile version