Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिरेकी समजून नागरिकांवरच गोळीबार !

कोहिमा वृत्तसंस्था | नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी अतिरेकी समजून नागरिकांवरच गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ उसळला आहे.

म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात सुरक्षा दलांनी चुकीने ग्रामस्थांनाच अतिरेकी समजून फायरिंग केली. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका जवानाचाही समावेश आहे. सुरक्षा दलांना एक गुप्त सूचना मिळाली होती. या सूचनेवरुन सुरक्षा दलांनी तिरू-ओटिंग रस्त्यावर हल्लाची योजना आखली होती, पण चुकून गावकर्‍यांना अतिरेकी समजून सुरक्षा दलाने हल्ला केला.

या हल्ल्यात गावकर्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांनी संतप्त जमावामध्ये रुपांतर केले आणि सुरक्षा दलांना घेराव घातला. सुरक्षा दलांना स्वसंरक्षणसाठी जमावावर गोळीबार करावा लागला आणि यात अनेक गावकर्‍यांना गोळ्या लागल्या. सुरक्षा दलांची अनेक वाहने जाळण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी ट्विट करुन शांततेचे आवाहन केले. राज्यातील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांची हत्या झाली. याची चौकशी उच्चस्तरीय विशेष तपास पथक करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओटिंगमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत नागरिकांची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना. उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करेल. अस त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version