Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिक्रमण निर्मुलन पथकाशी हुज्जत घालणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालय परिसरातील ८ ते १० दुकानांची  शेड जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. काही दुकानदारांनी पथकाशी हुज्जत घालून कारवाईस विरोध केल्याने त्यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मू.जे. महाविद्यालय परिसरातील दुकानदारांनी २० ते २५ फुटांचे शेड उभारुन अतिक्रमण केले होते. याबाबत या दुकानदारांना महापालिकेतर्फे स्वतःहून शेड काढण्याबाबत दुकानदारांना सूचित करण्यात आले होते. मात्र, या दुकानदारांनी सूचनेनंतरही स्वतःहून शेड न काढल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जेसीबीव्दारे सुमारे ८ ते १० दुकानांसमोरील शेड हटविले.  दरम्यान या कारवाईला तीन दुकानदारांनी विरोध केला. यावेळी त्यांनी पथकाशी वाद घालून कामात अडथळा निर्माण केला. यामुळे या तिघांविरोधात  संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गौरव लवंगडे, तर ज्ञानेश्‍वर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल मेघानी, नारायण मेघानी यांच्याविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण पथकास यानंतर ओंकारेश्‍वर मंदिर परिसरात काही खासगी क्लासेसचे विनापरवानगी लावलेले फलक दिसून आले.  पथकाने कारवाई करत २५ ते ३० फलक काढले. विनापरवानगी फलक लावणार्‍यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.  तसेच  दाणाबाजारात मालवाहू वाहनांना केवळ सकाळी १० च्यापूर्वी आणि सायंकाळी ५ नंतर परवानगी आहे. तीन पीकअप व्हॅन उभी असल्याने त्या जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

 

 

Exit mobile version