Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अण्णा हजारे उपोषणावर ठाम

अहमदनगर प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा ठाम निर्धार केला असून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिध्दी येथे विश्‍वस्त मंडळाच्या सदस्यांना संबोधित करतांना आपण आंदोलनावर ठाम असल्याचे प्रतिपादन केले. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणी या ज्वलंत प्रश्‍न न सोडविणारे हे सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले असल्याने आंदोलनानेच सरकारला जाग येईल. त्यामुळे आपण महात्मा गांधी पुण्यतिथी म्हणजेच दि. ३० जानेवारी पासून राळेगण सिद्धी येथे आपण आमरण उपोषण करणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी याप्रसंगी दिली. ते पुढे म्हणाले, गत वर्षी शहीद दिनी उपोषण केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्‍न, लोकपाल, लोकायुक्त प्रश्‍न सोडविण्यांबाबत लेखी आश्‍वासन दिले. परंतु, गेल्या ९ महिन्यांत त्याचे पालन केले नाही. लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन पाच वर्षे पुर्ण होण्याची वेळ आली तरी त्यांनी लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीत चालढकल करीत जनतेची दिशाभूल केली. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. यामुळे आपण आंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version