Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अटल करंडक एकांकिका स्पर्धा : १० डिसेंबरला होणार जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी

जळगाव, प्रतिनिधी | कोरोना काळात बंद पडलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा पनवेल आणि चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय पनवेल यांच्यातर्फे अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या एकांकिका स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव येथील समर्थ कला बहुउद्देशीय संस्थाद्वारा करण्यात येणार असून, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे दि. १० डिसेंबर रोजी तालिम स्वरुपात प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीकरिता सांघिक प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तर दिग्दर्शन, लेखन, पार्श्वसंगीत, पुरुष अभिनय, स्त्री अभिनयाची प्रत्येकी दोन प्रथम व द्वितीय अशी पारितोषिके स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
प्राथमिक फेरीनंतर दि. २८, २९ व ३० जानेवारी रोजी अटल करंडक या एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रंगणार आहे.

या महाअंतिम फेरीकरिता सांघिक प्रथम रु.१ लाख व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक रु.५० हजार व करंडक, तृतीय पारितोषिक रु.२५ हजार व करंडक, चतुर्थ पारितोषिक रु.१० हजार व करंडक व २ उत्तेजनार्थ पारितोषिके रु. ५ हजार व करंडक देण्यात येणार आहे. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पार्श्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रत्येकी प्रथम क्रमांक रु.२ हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक रु.१५०० व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक रु.१ हजार व स्मृतिचिन्ह तसेच २ उत्तेजनार्थ रु.५०० व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
तरी जळगाव केंद्रावर होणाऱ्या या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद येथील संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजक विशाल जाधव व मुख्य आयोजक आ.प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Exit mobile version