Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांवर दबावासाठी ईडीकडून अविनाश भोसलेंवर कारवाई ? ; दमानिया यांना शंका

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  परकीय चलन गैरव्यवहारात ईडीने अविनाश भोसले आणि कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा अजित पवारांवर दाबावाचा प्रयत्नं आहे का? अशी शंका अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

 

“अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

 

सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे,” अशी टीकाही अंजली दमानिया यांनी भाजपावर केली आहे.

 

अंजली दमानिया यांनी ट्वीटदेखील केलं असून म्हटलं आहे की, “अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का?खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता”.

अविनाश भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत.  दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणूकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९९९) कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती.

 

भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी १५ लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली ४० कोटी ४३ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

 

भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

 

Exit mobile version