Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांवर चंद्रकांत पाटील खवळले

 

मुंबई : वृत्तसंस्था । भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर प्रहार केला आहे.

 

सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,’ असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल  केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या शैलीतून उत्तरं दिलं. अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर संताप अनावर झालेल्या पाटलांनी पवारांना गर्भित इशाराच दिला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने  कोल्हापूर येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं.

 

“अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,” असा टोला पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

 

“अजित पवारांना कुणीही तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं.  तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.

 

“मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या सर्व मागण्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. पण केवळ कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही.   संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील, तर भाजपा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं होतं. “सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केलं की, झोपेत केलं होतं? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजपा नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार,” असं अजित पवार म्हणाले होते.

 

Exit mobile version