Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांकडून तिसऱ्या लाटेच्या धोक्याचा इशारा

 

पुणे : वृत्तसंस्था । जागतिक स्तरावरील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देखील दिला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात  जिल्हा आणि शहर या भागातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीवर आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली. पुण्यात या सर्व परिस्थितीशी लढण्यासाठी उपाय केल्या जात आहेत असं देखील त्यांनी सांगितलं.

 

अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. “पुणे जिल्ह्यात ७० लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर सध्या ५ ते ६ लाखांच्या दरम्यान रोजचे बाधित आढळत आहेत. ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

 

“पुण्यात ४ आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी काम चालू आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी ऑक्सिजन प्लांट असावा असं नियोजन केलं आहे. काही प्लांटचं काम सध्या सुरू देखील आहे. सध्या देशात सर्वात जास्त रुग्णसंख्या केरळमध्ये पाहायला मिळते आहे. आत्ता आपल्या भागात ८९८ कोविड लसीकरण केंद्र आणि खासगी ४०० केंद्र आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार यांनी पुणेकरांना लसीकरण करताना पहिल्या डोसपेक्षा दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जाईल, असं नमूद केलं आहे. “पुणे जिल्हा आणि शहरमध्ये पहिला डोस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झालाय, त्यांना दुसरा डोस देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करायचं धोरण आपण ठेवलं आहे. त्यानंतर राहिलेल्या लोकांना पहिला डोस द्यायचा. बिलं कमी करण्याविषयी देखील आपण कारवाई करतो आहोत”, असं ते म्हणाले.

 

Exit mobile version