Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अचानक ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय ;  संजय राऊत यांची जहरी टीका

मुंबई (वृत्तसंस्था) राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सूचवूनही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने सध्या शिवसेना राज्यपालांविरुद्ध आक्रमक झालेली आहे.

 

 

संजय राऊत यांनी ट्विट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाना साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवत येत आहे. समझनेवालों को इशारा काफी है!, अशी टीका राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यास २८ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच त्यांना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. मात्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठीच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरची डोकेदुखी वाढली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Exit mobile version