Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रविंद्र शोभणे यांची निवड !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. संमेलन अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

 

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला. २ फेब्रुवारी २०२४ पासून हे साहित्य संमेलन होणार आहे. २,३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली.

 

कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. नरखेड तालुक्यात खरसोली या गावी त्यांचा जन्म झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे तर पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात केला. १९८९ मध्ये त्यांनी पीएच.डी. ची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते परिचित आहेत. १९९१ मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.

 

डॉ. रवींद्र शोभणे यांना अनेक प्रकारचे सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी यवतमाळमधील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यांकडे होते. तसेच मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्यपदी ते होते. सन २००७ ते २०१२ यादरम्यान ते या पदावर होते.

Exit mobile version