Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे

 

राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली.

 

राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

 

या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.

 

या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

 

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, मात्र प्रवेशाच्या टक्के वारीमध्ये मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे.

 

Exit mobile version